धक्कादायक ! ‘या’ लोकप्रिय भाजप प्रवक्त्याचा दारुण पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने देशभरात मोठ्या प्रमाणात यश मिळवत तब्बल ३५० जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेस तसेच विरोधी पक्षांच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे यावेळी देखील मोदी लाटेत अनेक नवखे उमेदवार निवडून आले. मात्र याला अपवाद ठरले आहेत, भाजपचे एक प्रसिद्ध प्रवक्ते. त्यांच नाव आहे संबित पात्रा. अत्यंत आक्रमक शैलीत आपल्या पक्षाची बाजू मांडणारे हे प्रवक्ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र यात त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.

संबित पात्रा हे ओडीसातील पुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पुरी येथून बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी पराभव केला आहे. मोदी लाटेतही पराभव झाल्याने पात्रा यांना हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. पिनाकी मिश्रा या ठिकाणाहून २००९ आणि २०१४ असे सलग याआधी दोन वेळा निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी पात्रा यांना पराभूत करत विजय मिळवला आहे.

दरम्यान, मोठ्या नेत्यांचा पराभव होणे काही नवीन नाही, मात्र मोदी लाटेतही या लोकप्रिय प्रवक्त्याचा झालेला पराभव खूप महत्वाचा आहे. याचबरोबर अमेठी मधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला आहे.