सचिन वाझेबाबत ACP संजय पाटील यांच्या जबाबातून धक्कादायक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत. याप्रकरणातच ACP संजय पाटील यांनी दिलेल्या जबाबातून आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी पैशाच्या वसुलीबाबत आदेश दिल्याचे सचिन वाझेंनी मला सांगितल्याची कबुली पाटील यांनी चौकशीदरम्यान दिली आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या भेटीविषयीही पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ज्ञानेश्वरी बंगल्यावर गेलो होतो. यावेळी मी गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला भेटलो. मात्र गृहमंत्र्यांना भेटलो नाही. तसेच वसूलीबाबत काही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी CBI चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे CBI कडून वाझे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. CBI ने याबाबत NIA कोर्टात मागणी केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाला नव वळण मिळाले असून आगामी काळात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेतले होते. वाझेच्या नियुक्तीची शिफारस मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीच केली असल्याचा दावा आता एका पत्राच्या आधारे केला जात आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.