खळबळजनक ! आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या घरीच चोरी झाली आहे. दादर रेल्वे पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. वसाहतीत राहणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी ही चोरी झाली आहे. यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या घरातून ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

३२ वर्षीय तक्रारदार महिला या दादर रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस निरीक्षक इमारतीत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे पती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यापाठोपाठ त्यादेखील ११ च्या सुमारास कामावर गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतल्या तेव्हा, कुलूप बाजूला पडलेले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. दागिन्यांसह ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली.

त्याचवेळी त्यांच्या शेजारील पोलीस उपनिरीक्षक इमारतीत राहणारे आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजले. सावंत यांचे सासरे कमलाकर दांडेकर (६६) यांनी त्यांना याबाबत कळविले. सावंत घरात नसताना, लुटारूने त्यांच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि ड्रेसिंग टेबल उघडलेला दिसला. मात्र घरातून काहीही चोरीला गेलेले नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त