अमेझॉनकडून हिंदू संस्कृतीचा अपमान, ॐ अक्षर लिहिलेल्या डोअर मॅटची विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. दिवाळीच्या ( Diwali) धामधुमीची सुरुवात झाली असून, नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. बाजारातून खरेदी करण्याबरोबरच नागरिक ऑनलाईनदेखील खरेदी ( Online Shopping) करत आहेत.परंतु त्याचदरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ईकॉमर्स ( E- Commerce) कंपनी अ‍ॅमेझॉन ( Amazon) ॐ अक्षर लिहिलेल्या डोअर मॅट म्हणजेच पाय पुसण्या विकत आहे. एवढेच नाही तर हिंदू देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रेही विकली जात असल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही विक्री भारतात करण्यात येत नसून परदेशांमध्ये या वस्तू विकल्या जात आहेत.

यामुळे ट्विटरवर अ‍ॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅग वापरून परदेशातील भारतीयांनी अ‍ॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे. याआधी अमेझॉनवर हिंदू देव देवतांची चित्रे असलेल्या चपला आणि बुटांचीदेखील विक्री करण्यात येत आहे. त्यावेळीदेखील याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानांचे फोटो छापलेल्या वस्तू विकल्या जातात. यामध्ये हाफ पॅन्टपासून ते अंडरगारमेंटपर्यंत या छायाचित्रांचा वापर केला जातो. परंतु हिंदू संस्कृतीमध्ये हे कृत्य चुकीचे आहे. यामुळे परदेशातील अनेकांनी अमेझॉनविरोधात मोहीम उघडली असून, अ‍ॅप अनइन्स्टॉल करायला सांगितले आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरून ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. भारतामध्ये असे प्राॅडक्ट विकले जात नसले तरी जगातील इतर देशांमध्ये असे प्राॅडक्ट विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरून केला आहे. त्यामुळे आता अमेझॉनकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.