मुलानं ‘फाशी’ घेतल्याचं पाहून आईने कापली हाताची ‘नस’ !

कानपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  मोबाईलवर सतत बोलत असल्याने सारखे बोलल्याच्या रागातून १८ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाला लटकलेले पाहून त्याच्या आईने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

कानपूरमधील बर्रा जिल्ह्यातील ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक जयस्वाल हे प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करतात. त्यांना पत्नी दीपा, मुलगा विभू (वय १८) आणि मुलगी कोसिन असा परिवार आहे. मुलगा विभू याने यंदा इंटरची परीक्षा दिली आहे. परिक्षा संपल्यानंतर तो दिवसभर मोबाईवर बोलत असे. त्यामुळे वडिलांनी त्याला बर्‍याच वेळा तंबी दिली होती.

परीक्षा संपलेल्या व सध्या सुरु असलेला लॉक डाऊन यामुळे घरी असल्याने विभू सातत्याने मोबाईलवर बोलत होता. त्यावरुन त्याला वडिल पुन्हा बोलले. त्यामुळे रागावून तो आपल्या खोलीत निघून गेला.

बराच वेळ विभू खोली असल्याचे पाहून त्याची आई त्याला पाहण्यासाठी खोलीत गेली. तेव्हा विभू ने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून ती ओरडली व त्यानंतर स्वत:चा जीव देण्यासाठी तिने हाताची नस कापून घेतली. घरातील लोकांना हा प्रकार समजताच त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

You might also like