Aurangabad News : धक्कादायक ! 7 वी त शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. ही घटना शहरातील गारखेडा परिसरातील आनंदनगर मध्ये सोमवारी (दि.1) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे (वय-14 रा. आनंदनगर, गारखेडा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी ही इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. तिचे आई-वडील चणे-फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. रोजच्या प्रमाणे आई-वडील व लहान भाऊ हे तिघेही फुटाणे विक्रीसाठी गेले होते. सर्वजण रात्री नऊच्या सुमारास घरी आले. घराचा बाहेरचा दरवाजा बंद होता. तर घरात संजीवनी दिसली नाही. तिला आवाज दिला मात्र तिने कोणताच प्रतिसाद दिला नसल्याने ती शेजारी गेली असावी असे घरच्यांना वाटले.

मात्र, काही वेळानंतर लहान भाऊ जेव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा संजीवनीने साडीच्या सहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने घटनेची माहिती आई-वडीलांना दिली. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संजीवनीला खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

नेहमी हसत खेळत राहणारी संजीवनी हिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल एवढ्या लहान वयात का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पुंडलीकनगर पोलीस करीत आहेत.