धक्कादायक ! बावधनच्या सॉफ्टवेयर कंपनीत जातीवरुन महिलेला दिला त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या जगात कोण कोणत्या जातीचा हा विचार केला जात नाही. किंबहुदा तुझी जात कोणती विचारले जात नाही. तुम्ही काम कसे करता यावर तुमचे क्वॉलिफिकेशन ठरते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तर ते अधिक महत्वाचे आहे, असे सांगितले जाते. मात्र बावधन येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत एका महिलेला ती मागास असल्यावरुन तिच्या चार सहकाऱ्यांनी तिला मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या कंपनीतील मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका २३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बावधनमधील ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस या सॉफ्टवेअर कंपनीत नोव्हेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला.

या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती या कंपनीत काम करीत असताना मागास जातीची आहे, हे समजल्यावर मॅनेजर, टीम लिडर व दोन कर्मचाऱ्यांनी तिला मानसिक त्रास देण्यास सुुरुवात केली. टीम लिडर तिला कोणतेही काम न देता दुर्लक्ष करीत. ती कामानिमित्त त्यांच्याकडे गेली की, काही एक न ऐकता त्यांचेपासून दूर निघून जात होते. तसेच त्यांच्या दोन सहकारी एकत्रितपणे कमेंट करुन त्यांच्याकडे बघून हसत व त्यांना टीममध्ये सामील करुन घेत नव्हते. त्याच्यातील एकीच्या हाताखाली त्या काम करीत असताना तू बहोत छोटी है, तुला जगात खूप काही गोष्टी बघायच्या आहेत.

तेरा छोटा दिमाग चलता नही, तुझे टीम मे रखना नही, असे वारंवार म्हणून त्यांना त्रास देत असत. चौघांनी मिळून या महिलेला एकटे पाडून काम करीत असत. व त्यांना कोणत्याच प्रकारची मदत करत नसत. त्या क्युबमध्ये काम करीत असताना त्यांच्यातील एक जण एक दोन वेळा त्यांच्याजवळ येऊन त्यांचा उजवा हात दाबून तू शादी कब करनेवाली है, तू सात बजे के बाद कंपनीमे क्यु नही रुकती असे बोलून हाताला स्पर्श करुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.