धक्कादायक ! सोन्याच्या हव्यासापोटी सोनाराचा खून, दोघांना अटक

शेवगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या हव्यासापोटी सोनाराचा खून करून मृतदेहाचे दफन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भातुकडगाव (ता. शेवगाव) येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे.

विशाल सुभाष कुलथे (वय 25, रा. शिरुर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या सोनाराचे नाव आहे. केतन लोमटे आणि शिवाजी गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर गायकवाड अद्यापही फरार आहे.

शिरूर कासार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलुनचे दुकान आहे. माझा लॉकडाऊनमध्ये विवाह झाला असून, मला जादा सोने खरेदी करावयाचे आहे. आपण तयार असलेले जादा सोने घेऊन दुकानात येण्यास मृत सोनारास सागिंतले होते. त्यानुसार सोनार सोने घेऊन दुकानात आला असता आरोपीने सोने लुटण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्यांचा खून केला. त्यानंतर खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह भातकुडगावच्या शिवारात पुरला होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी केतन लोमटे यास ताब्यात घेतले. त्‍याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. तसेच मृतदेहाचे ठिकाण दाखवले. पोलिसांनी पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढला. 20 मे रोजी विशाल कुलथे या सोनाराचे अपहरण झाल्याचा गुन्हा शिरूर कासार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी याचा छडा लावला आहे. शिरूर कासारचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ माने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.