धक्कादायक ! क्वारंटाईन केलेल्या 11 जणांना टेम्पोतून घेवून जात होता ठेकेदार, पुण्यात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात पोलिसांनी आजपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर नाकाबंदीत पोलिसांनी क्वारटाईन केलेल्या 11 जणांना पकडले आहे. यानंतर पोलीसही आवक झाले. धक्कादायक म्हणजे, ठेकेदार या 11 जणांना घेऊन जात होता.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी केली जात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठ्या चौकांत व महत्वाच्या ठिकाणी पोलीस 24 तास थांबले आहेत. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस आज सकाळी अकराच्या सुमारास संचेती चौकात वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून ११ जण प्रवास करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्यांना टेम्पोतून खाली उतरवून चौकशी केली असता, त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, परराज्यातून प्रवास केल्यानंतर ठेकेदार त्यांना घेउन कामावर निघाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल केला आहे.

संचेती चौकात नाकाबंदी करत असताना टेम्पोतून ११ क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कामगारांना क्वारंटाईन करण्याचे सांगण्यात आले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक बाळासोहब कोपनर यांनी सांगितले.