धक्कादायक..! गरोदर पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पौड (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे ग्रामीण हद्दीतील पिरंगुट येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या गरोदर पत्नीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. पतिने आपल्या गरोदर पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करुन खून करुन स्वत:वरही वार करुन घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिता शिंदे असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी सुनील विलास शिंदे याने घटनेनंतर आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुनील शिंदे याचे मूळगाव मुळशी तालुक्यातील पिंपळोली हे असून त्याचा पिरंगुट येथे वाहनांच्या बॅटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो पिरंगुट येथील मुळशी टॉवर या इमारतीत राहत होता. मागील एक वर्षांपूर्वीच त्याचे अनिता बरोबर लग्न झाले होते. लग्नापूर्वी त्याने मुळशी टॉवर या इमारतीत स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता. दोघे नवरा बायको या नवीन घरात वास्तव्यास होते.

आज सकाळी घरात असताना नवरा बायको मध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. आतून दार लावून हे भांडण सुरु असताना पत्नीला तो मारहाण केल्यानंतर ती गॅलरीत येऊन मला वाचवा मला वाचवा अशा हाका मारू लागली. तिच्या आवाजाने नागरिकांनी घराकडे धाव घेतली. मात्र दार आतून बंद असल्याने आणि आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.