धक्कादायक ! हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहितेच्या तोंडत ओतली अ‍ॅसिडची बाटली

निमगाव/ उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहित महिलेला अ‍ॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील नीमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाले आहेत. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्याच्या मागणीवरुन जबरदस्तीने अ‍ॅसिड पिण्यास भाग पडले. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी रुची मिश्रा (वय-27) हिने निमगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुची हिचा विवाह सुनैरा येथील अनुप कुमार याच्यासोबत झाला आहे. तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केला. पती अनूप कुमारसह शकुंतला देवी, मीरा देवी, ललितकुमार, गंगा देवी आणि पूजा देवी यांनी तिला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात अ‍ॅसिड ओतले. यामध्ये रुची गंभीर जखमी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला बेहजम सीएचसी येथे नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. याप्रकरणी प्रभारी गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, पीडितेचे पाय जळाले आहेत. वैद्यकीय अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. आरोपींचा शोध सुरु असून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

तोंडातून जळालेले मासाचे तुकडे बाहेर पडले

पीडितेचा भाऊ नितेश मिश्रा याने सांगितले की, बहिणीला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी जबरदस्तीने अ‍ॅसिड पाजले नाही तर तिला जाळले. त्यामुळे पीडितेचा खालचा भाग जळालेला आहे. गंभीररीत्या जळालेल्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी उलटी करायला सांगितली, तेव्हा अ‍ॅसिडमुळे जळाल्याने मासाचे तुकडे बाहेर पडले. पोलिसांनी नितेश मिश्राचा जबाब मंगळवारी घेतला आहे. त्याने जबाबात सांगितले की, त्याच्या बहिणीला मारुन नवरा दुसरा लग्न करणार होता. असा त्याचा कट आहे. बहिणीला दोन वर्षाची मुलगी आहे, तीने तिला आपल्या बरोबर आणले आहे.