धक्कादायक …! गावात स्वाइन फ्लूची अफवा … बहिष्कार… ना पाणी,ना दूध, ना शाळा 

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात एक अजब घटना घडली आहे. या जिल्ह्यातील एका गावात स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवेमुळे मात्र तेथील  गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्वाईन  फ्लूचा आजार पसरल्यामुळे या गावालाच बहिष्कृत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधेत व्यक्तींचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण तरी देखील दुसऱ्या  गावातील ग्रामस्थ डॉक्टरांचेही म्हणणं ऐकण्यास तयार नाहीत. या गावात दैंनदिन वापराच्या वस्तूदेखील पुरवण्यास विरोध केला आहे.

अख्ख्या गावावरच बहिष्कार 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आठवड्या भरापूर्वी कृष्णा जिल्ह्यातील एका गावात ४५ वर्षीय नामचार्या आणि ३२ वर्षीय मरियम्मा यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचाही मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे या गावावर शेजारील गावांनी बहिष्कार टाकला. या गावातील स्थानिकांनी आरोप केला आहे की, जबरदस्तीनं आम्हाला प्रवासी बसमधून खाली उतरवलं जाते, लहान मुलांना घेण्यासाठी शाळेची बस येत नाही, दूध विक्री होत नाही, एवढंच नाही तर गावाच्या पाणीपुरवठ्यातही अडथळे निर्माण केले जात आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. गावातील तपासणी आणि शेजारील गावकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक येथे रवाना करण्यात आले आहे. शिवाय, गावावर अद्यापही अन्याय सुरू असल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येणार, असं आश्वासन जिल्हा मुख्यालयाकडून देण्यात आले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे संबंधितांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय तपासणीत आम्हाला स्वाइन फ्लूची लक्षण आढळली नाहीत. पसरलेल्या अफवांमुळे गावकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.