Pimpri News : धक्कादायक ! आठवीत शिकणाऱ्या मुलीला झुम अ‍ॅपवरून अश्लील मेसेज

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी (Bhosari) येथील एका आठवीत शिकणाऱ्या मुलीला झुम अॅपवर (Zoom App) अश्लील मेसेज (pornographic Message) आले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीने आत्महत्या करावी अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून हा प्रकार वारंवार होत असल्याने याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-42) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलीसंबंधी तिचे वडील आणि मुख्याध्यापकांच्या मेलवर देखील अश्लील मेसेज आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे शाळांकडून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलीला अश्लील मेसेज आला असून तिला जीवे मारण्याची धमकी झूम अॅपवर देण्यात आली आहे. तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा गंभीर प्रकार 15 जून ते 12 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपीने माझा माणूस तुझ्याकडे पाठवतो, तू जर आली नाहीस तर जीवे मारेल, अन्यथा तू आत्महत्या कर असे झूम अॅपवर मेसेज आरोपीने पीडित मुलीला केले आहेत. गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या आणि ज्या शाळेत मुलगी शिक्षण घेत आहे तेथील मुख्याध्यापक यांच्या मेलवर देखील मुलीसंबंधी अश्लील मेसेज आल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने सर्व पालकांची आणि मुलांची बैठक घेऊन असं कोणा संबंधी घडल्यास तात्काळ याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे करत आहेत.