धक्कादायक ! ‘छपाक’ चित्रपटावरील चर्चेदरम्यान ‘तरुणा’वर ॲसिड ‘हल्ला’

उन्नाव : वृत्तसंस्था – ॲसीड हल्ला प्रकरणावर नुकताच छपाक हा चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. हा चित्रपट ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या तरुणीवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशातील एका तरुणावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उन्नावच्या मौरवनमध्ये एका तरुणीने तरुणावर ॲसिड फेकले. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर लखनऊमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ॲसिड हल्ल्याची अद्याप माहिती दिली नाही.

पोलिसांनी एका तरुणीला ताब्यात घेतले असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुणी आणि पीडित तरुणे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघेही मौरावा परिसरातील गोनामाऊचे रहिवाशी आहेत. तरुण डेअरी चालवण्याचे काम करतो. सोमवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास तो टँकरमध्ये दूध पाठवून डेअरी साफ करत असताना तरुणीने त्याच्यावर ॲसिड फेकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या घटनेत तरुणाचा गळा, छाती, कान, मागील भाग जळाला आहे. जखमीला तातडीने लखनऊच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. मात्र, दोघे वेगवेगळ्या धर्माचे असून दोघेजण बराच काळ एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा