धक्कादायक ! पुण्यात ‘कोरोना’बाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून दररोज अनेक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी उपचार घेणाऱ्या महिला सुरक्षीत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता हडपसरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयातील वॉर्डबॉयने एका कोरोना बिधित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडत असल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नामदेव गवळी (वय-40 रा. वडगावशेरी) या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. हडपसर भागातील सह्याद्री रुग्णालयात तो सेवेत असून याच रुग्णालयात एका 35 वर्षाच्या महिलेवर कोरोनावर उपचार सुरु आहेत. ही महिला एका खोलीमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आराम करत होती. त्यावेळी अशोक गवळीने महिलेच्या खोलीत जाऊन तिच्या चेहऱ्यावरील मास्क काढून तुम्ही मला ओळखता का ? असे विचारत लज्जास्पद कृत्य केले.

दरम्यान, रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिल्यानंतर गवळीला हटकले. त्यावेळी गवळी तेथून पळून गेला. प्रत्यक्षदर्शी महिला कर्मचाऱ्याने घडलेला सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला त्वरित कळवला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पीपीई किट घालून महिलेच्या खोलीत जाऊन महिलेचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपीला अटक केली. तसेच आरोपीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.