Facebook Live करत तरूणानं संपवलं आयुष्य, पगार न मिळाल्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिसारमधील त्रिवेणी विहार कॉलनीत राहणाऱ्या ३० वर्षीय पवन उर्फ पोनीने फेसबुक लाईव्ह करत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत कुटूंबीयांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

यासंदर्भात तपास अधिकारी एएसआय सतपाल सिंह म्हणाले की, उकलानाच्या शहरातील त्रिवेणी विहार येथील ३० वर्षीय पवनने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केल्याची माहिती कुटूंबीयांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला. तथापि, तपास अधिकारी सतपाल यांनी सांगितलं, मृत पवनचा चुलत भाऊ चंद्रमोहन याच्या तक्रारीवरुन ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

याबाबत पवनच्या चुलत भावाने सांगितलं की, पवन एका कंपनीत ट्रक ट्रेलर चालवत असे आणि त्याला काही दिवसांपासून मानसिक त्रास देण्यात येत होता. कंपनीने कित्येक महिन्यापासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवनने आत्महत्या केल्याचं तो म्हणाला. तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं की, गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासास सुरुवात करण्यात आली आहे. कंपनीने पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासाने पवनने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली.