धक्कादायक ! TV सिरीयलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर पुण्यात सामुहिक बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टी व्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईतील तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणून एका तरुणीनेच या तरुणीला ज्यांची निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन दिली, त्यांनीच तिच्यावर अत्याचार केला. तिच्यावर बलात्कार करण्यासाठी या तरुणीनेच त्यांना मदत केली.

याप्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना विमाननगरमधील हॉटेल एच एच आयमध्ये ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी अंधेरीतील एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. छाया नावाच्या एका महिलेने या तरुणीला तिच्या ओळखीच्या निर्माता व दिग्दर्शकांकडून टीव्ही मालिकामध्ये काम मिळवून देते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने विश्वास ठेवला. त्यानंतर तिला घेऊन छाया कॅबने मुंबईहून पुण्यात आली. विमाननगर येथील एच एच आय हॉटेलमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली. याच हॉटेलमध्ये आणखी काही जणांना टीव्ही मालिकेत काम देण्याच्या नावाखाली आणण्यात आले होते.

नागपूर येथील दोघांची छायाने निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन दिली. तिच्या खोलीमध्ये त्यांनी मध्यरात्रीपर्यंत मद्यपान केले. त्यानंतर त्यांनी या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार देताच छाया हिने तिच्या हातातील बीयरची बाटली या तरुणीच्या हातावर मारुन तिला जखमी केले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी खूप घाबरुन गेली. त्यांच्या भितीने तिने आतापर्यंत तक्रार दिली नव्हती. आता तिने हिंमत करुन आपल्यावरील अत्याचाराची बाब पोलिसांपुढे कथन केली. विमानतळ पोलीस त्यांचा शोध घेत आहे.