शिक्षेची सुनावणी करताच भिरकावली न्यायाधीशांवर चप्पल

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच आरोपीने संतापाच्या भरात न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी न्यायालयात घडला. अशरफ अन्सारी (वय-२२ रा. आमपाडा) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अशरफ अन्सारीवर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर चोरीचा भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यांच्या संदर्भात भिवंडी न्यायालयात न्यायाधीश पठाण यांच्यासमोर शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केलेला हा आरोपी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याला काल (29 जानेवारी) भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे.पठाण यांच्यासमोर हजर केलं होतं. तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं न्यायाधीशांनी यावेळी अशरफला सांगितलं. मात्र मी आधीच 14 महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावं, अशी विनंती आरोपीने केली.

परंतु असं होऊ शकत नाही, आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असं न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावीचे हॉल तिकीट आजपासून ऑनलाइन