तर मला गोळ्या घाला : काँग्रेस नेते अशोक तंवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरु झाले होते. अनेक मोठ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा केंद्रीय समितीसमोर सादर केला होता. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत गटबाजी आणि कलहानंतर आता हरियाणामध्ये अशीच घटना समोर आली आहे.

या पराभवाच्या नतराजीचा सामना हरियाणातील काँग्रेस नेते अशोक तंवर यांना देखील करावा लागला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आयोजित करण्यात आलेल्या चिंतन बैठकीत त्यांनी म्हटले कि, जर मला तुम्हाला मारायचे असेल तर गोळ्या घाला मला. हरियाणाचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्या जवळच्या आमदारांनी त्यांच्यावर निशाणा साधल्यानंतर नाराज झालेल्या अशोक तंवर यांनी असे म्हटले. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या १० पैकी एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने नेतृत्व बदलाची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, असाच प्रकार राजस्थानमध्ये देखील समोर आला आहे. राजस्थामनधील अनेक आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात जाऊन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना फक्त ९२ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३५३ जागांवर विजय मिळाला होता.