‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचं कोरोनामुळं निधन, मेरठच्या खासगी रूग्णालयात सुरू होते उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘शूटर दादी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. चंद्रो तोमर यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मेरठच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

चंद्रो तोमर या त्यांच्या कुटुंबियांसोबत उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहत होत्या. मंगळवारी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यांना श्वसनात अडचणी येत होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांचे निधन झाले आहे. चंद्रो तोमर यांनी नेमबाजीत विशेष नाव मिळवले होते. जेव्हा त्यांनी नेमबाजी सुरु केली. तेव्हा त्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्या विजयीही झाल्या होत्या. त्यांना जगातील सर्वांत जास्त वयाच्या नेमबाज म्हणून ओळखले जात होते.

दरम्यान, चंद्रो तोमर यांनी त्यांचे नातेवाईक प्रकाशी तोमर यांच्यासह अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला होता. जगातील सर्वांत वयस्कर महिला नेमबाजांमध्ये प्रकाशी यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात पुरुषप्रधान समाजातील अनेक रुढी संपवल्या आहेत.