खळबळजनक ! शेतकर्‍यांनी मीडियासमोर उभा केलेल्या शार्पशुटरचा दावा, म्हणाला – ‘माझं अपहरण करून बोलायला भाग पाडलं’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हरियाणातील सोनीपत येथील या व्यक्तीने आपण १९ जानेवारीला दिल्लीतील नातेवाईकांकडे आलो होतो. दिल्लीत येत असताना काही लोकांनी आपले अपहरण करुन मारहाण केली आणि आम्ही जे सांगतो तेच माध्यमांसमोर सांगण्याचा दबाव आणल्याचा दावा त्याने केला आहे. त्या व्यक्तीचे नाव योगेश असल्याचे सांगण्यात येते. योगेशला आंदोलक शेतकऱ्यांनी त्याचा चेहरा झाकून माध्यमांसमोर उभे केले होते. त्यावेळी त्याने दिल्लीत २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर गोळीबार करण्यासाठी तसेच ४ शेतकरी नेत्यांची हत्या करण्यासाठी आपल्याला पाठवल्याचे म्हटले होते.

दरम्यान, चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या युवकाला पकडून आंदोलक शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभा केल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु, आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे दिसत आहे. ज्या व्यक्तीला शूटर असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांसमोर उभा करण्यात आले होते. त्या व्यक्तीने चौकशीत खळबळजनक आरोप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आता योगेशने त्या आंदोलकांनीच आपल्याला असे बोलण्यास सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपहरण करणाऱ्या लोकांनी मला कॅम्पमध्ये नेले आणि तिथे मला मारहाण केली. रात्री आपल्याला दारु पाजवल्याचेही त्याने सांगितले. त्याचबरोबर आपल्याबरोबर आणखी काही युवकांना पकडल्याचे तो म्हणाला. विशेष म्हणजे योगेशने राई ठाण्यातील प्रदीप नावाच्या ज्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला. त्या नावाचा कोणताच अधिकारी तिथे काम करत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.