धक्कादायक ! मुख्याध्यापकाचा काटा काढण्यासाठी शिक्षकानेच तरूणाला घेवुन दिला गावठी कट्टा, पुढं झालं ‘असं’ काही

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षकानेच शाळेतील विद्यार्थ्याला मुख्याध्यापकावर गोळीबार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोर तरुणास पिस्तुल खरेदीसाठी शिक्षकाने पैसे दिल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. मुख्याध्यापकांनी अमानी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कार्यालयात ५-६ शिक्षकांची बैठक बोलावली होती. त्यावेळेस अचानक एक तरुण तिथे पोहोचला. आणि नंतर मुख्याध्यापकांच्या दिशेने त्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. मात्र, सुदैवाने मुख्याध्यापकांना गोळी लागली नाही. तसेच इतर कोणीही जखमी झालं नाही.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सुशांत खंडारे (वय २२) हा युवक स्थानिक जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे. त्याला शाळेत शिकत असल्याचा निर्गम उतारा पाहिजे असल्याने तसा अर्ज केला होता. पण, उशीर होत असल्याचं कारणं पुढे करत आज मुख्याधापक विजय बोरकर आणि शाळेतील इतर ५-६ शिक्षक कार्यालयात असताना सुशांत हा शाळेच्या कार्यालयात थेट दाखल झाला. मग त्याने हातातील कट्टा शिक्षकाकडे रोखवत धमकावले आणि गोळी झाडली. पण सुदैवाने गोळी कपाटावर लागली. घडलेल्या गोळीबारामुळे शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तो विद्यार्थी कट्टा तिथेच टाकून पळून गेला. पोलिसांनी आरोपीस अटक करुन पोलीस स्टेशनमध्ये आणले.

कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला एक विद्यार्थी फक्त निर्गम उतारा मिळण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरुन गोळीबार करणार नाही, असे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवनकुमार बनसोड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव त्यांच्यासमोर आले. यापूर्वी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले गजानन इंगळे यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार होता. पण त्यांच्याकडील हा प्रभार काढून विजय बोरकर या शिक्षकाकडे देण्यात आला. तोच राग मनात धरुन गजानन इंगळे याने बोरकर यांचा काटा काढायचं ठरवलं.

म्हणून या शिक्षकाने सुशांत खंडारे या युवकाच्या डोक्यात भरवले आणि कट्टा खरेदीसाठी ४० हजार रुपये दिले. त्यानंतर विद्यार्थ्याने एक कट्टा खरेदी केला. तसेच एक दिखाऊ पिस्टल ही ऑनलाइन खरेदी केले. आज या कट्ट्यामधून खंडारे याने शाळेत जाऊन शिक्षकांना धमकावत गोळीबार केला. दरम्यान, घटनेनंतर आरोपी युवक व शिक्षक गजानन इंगळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने करत आहे.