टोळक्याने दहशत करत दुकानदाराला लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – साने चौकात भांड्याच्या दुकानात जाऊन टोळक्याने पाच लाख रुपयांची मागणी करत दहशत केली. दुकानातून 7 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

या प्रकरणी अमित महादेव साठे (18, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. तर बंड्या, सुजित, आकाश, संतोष, गणेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित याचे साने चौकातील साईबाबा मंदिराजवळ भांडी विक्रीचे दुकान आहे. दुकानावर त्याचे मेहुणे आणि आई असतात. रविवारी रात्री अमित याचे मेहुणे आणि आई दुकानावर असताना आरोपी दुकानात आले. त्यांनी पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी फेकून दिली. तसेच दुकानातील 7 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले. तपास चिखली पोलीस करीत आहेत.