‘ही’ नवीन योजना देणार सैन्यात भरती होणाऱ्यांना अधिक पगार, भरपूर सुट्ट्या आणि शेवटी ३८ लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सैन्यात भरती होण्याची प्रक्रिया अत्यंत कठिण आहे. यासाठी लावण्यात येणारे नियम व परीक्षाही कठिण असल्याने सैन्यात करियर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. सैन्यात भरती होण्यासाठी व तरुणांना आकर्षित करण्यासाठी सरकारने नवीन योजना आणली आहे. चांगल्या पगाराचं पॅकेज, पेड स्टडी लिव्ह आणि १० किंवा १४ वर्षाचा कार्यकाळ संपवला की हातात चांगली रक्कम यांसारख्या गोष्टींचा यात अंतर्भाव असेल.

तब्बल एवढ्या जागा रिक्त –

भारतीय लष्करासमोरील आव्हानं दिवसागणिक वाढतच आहेत. त्यातच भरीस भर म्हणजे लष्करात ४९,९३३ अधिकाऱ्यांची गरज आहे. पण त्याऐवजी ४२,६३५ अधिकारीच सेवेत आहेत. अशा प्रकारे सेनेत ७ हजारापेक्षा जास्त अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तर भारतीय नौदलात १,६०६अधिकारी कमी आहेत. वायुसेनेत अधिकारी आणि जवान यांची १९२ अधिकारी पदं रिकामी आहेत. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी भारतीय लष्कर एक नवी योजना घेऊन येतेय.

अशी असेल योजना –

सूत्रांच्या माहितीनुसार , दर वर्षी दोन महिन्यांचा जादा पगार जोडून वर्षाच्या शेवटी दिला जाईल. सुरुवातीला १० वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी दोन महिन्यांचा पगार आणि शेवटच्या ४ वर्षांत ४ महिन्यांचा पगार दिला जाईल.शाॅर्ट सर्विस कमिशनप्रमाणे अधिकाऱ्यांची २० वर्ष पूर्ण होतील आणि त्यांना निवृत्ती वेतन मिळेल, यासाठी त्यांना डिफेन्स सिक्युरिटी काॅर्प्स किंवा नॅशनल कॅडट काॅर्प्समध्ये पाठवलं जाईल. हे व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी पेड स्टडी लिव्ह आणि इतर सुविधांचा विचार केला जाईल. १० वर्ष काम करून लष्कराची सेवा सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना १७ लाख रुपये मिळणार. तर १४ वर्ष सेवाकाळ पूर्ण केला तर ३८ लाख रुपये दिले जातील.