जितेंद्र आव्हाडांचे मोदी सरकारला उत्तर, म्हणाले – ‘…तरी महाराष्ट्र लढेल अन् जिंकेल… जय महाराष्ट्र’

पोलीसनामा ऑनलाइनः राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस राज्यात आरोग्य सुविधा कमी पडत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. असे असतानाच केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. राज्याकडून सातत्याने केंद्राकडे ऑक्सिजन, इंजेक्शन पुरवण्याची मागणी केली जात आहे. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आकडेवारी मांडत केंद्राला उत्तर दिले आहे. ..तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल …जय महाराष्ट्र असे ट्विट करत आव्हाडांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा शनिवारी (दि.17) आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर्स वाटपाची माहिती दिली. यात उत्तर प्रदेश, गुजरातपेक्षा महाराष्ट्राला कमी व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. त्यावर आव्हाड यांनी बोट ठेवत या बैठकीची माहिती देणारी बातमी शेअर केली आहे. त्यातील आकडेवारीचा हवाला देत केंद्रावर निशाणा साधला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास 1121 व्हेंटिलेटर्स दिले आहेत. तर 1700 उत्तरप्रदेशला, 1500 झारखंडला, 1600 गुजरातला, 152 मध्यप्रदेशला आणि 230 छत्तीसगढला दिल्याची माहिती डॅा. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. …..तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ……जय महाराष्ट्र असे ट्विट करून आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.