मुलीच्या डोळ्या देखत हल्लेखोरांनी आईवर झाडल्या गोळ्या, सर्वत्र प्रचंड खळबळ

पारनेर : पोलीसनामा ऑनलाइन – घरी आलेल्या दोघा तिघांचे महिलेशी झालेल्या वादावादीत एकाने पिस्तुलातून गोळीबार करुन तिची हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सविता सुनिल गायकवाड (वय ३५) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे. मुलीच्या डोळ्या देखत हल्लेखोरांनी सविता यांच्यावर गोळ्या झाडल्या. हे पाहून या मुलीला मोठा धक्का बसला आहे.

याबाबतची माहिती अशी, सविता गायकवाड या पारनेर -अलकुटी मार्गावरील वडझिरे गावात राहतात. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन जण यांच्याकडे आले. त्यांच्यात काही कारणावरुन वादावादी सुरु झाली. तेव्हा त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुल काढून गायकवाड यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. जवळून गोळ्या झाडल्याने त्या जागीत खाली कोसळल्या. हे पाहून तिघेही जण पळून गेले.
गायकवाड यांच्या मुलीने आरडाओरडा केल्याने गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सविता गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणला. यावेळी मोठा जमाव जमला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पारनेर ग्रामीण रुग्णालयातही पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, सविता गायकवाड यांचा या तरुणांशी कशामुळे वाद झाला होता याची माहिती मिळालेली नाही.आपल्या डोळ्यादेखत आईवर गोळ्या झाडत असल्याचे पाहिल्याने त्यांच्या मुलीला मोठा धक्का बसला आहे. तिने सांगितलेल्या हल्लेखोरांच्या वर्णनावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

You might also like