Pune News : कंपनीत कामाला जाऊ नको म्हणून तरुणावर चाकूने वार, लोहगाव परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कंपनीत कामाला जाऊ नये या कारणावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.

गणेश चौधरी (वय 32 रा. खांदवेनगर, लोहगांव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक काळुराम ताठे (वय 50 रा. खांदवेनगर, लोहगांव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी आणि ताठे हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. अशोक ताठे हा एका कंपनीत कामाला आहे. चौधरी हा कागदी पुष्ठे गोळा करुन त्या कंपनीत जमा करण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी खांदवेनगर येथील मिलटरी टॉवरजवळ चौधरी उभे असताना ताठे दारु पिऊन तेथे आला. मी जेथे काम करतो, त्या कंपनीमध्ये असलेले पुष्ठे गोळा करण्यास जाऊ नको, असे ताठे चौधरीला म्हणाला. त्यावर चौधरी याने कंपनी काय तुझ्या बापाची आहे का असे म्हटले. त्यावर चिडून ताठे याने खिशातून बटन चाकू काढून चौधरी याच्या गळ्यावर, पोटावर, उजव्या हाताच्या बोटावर वार करुन जबर जखमी केले. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने अधिक तपास करीत आहेत.