‘पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचे श्रेय घेऊ नये’, शिवसेनेचा मनसेला ‘टोला’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व्यापक मोर्चा काढणार आहे. या घुसखोरांना हाकलावंच लागेल, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले कि, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याच्या भूमिकेवर ठाम का असू नये ? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित नाही करता येणार. महत्वाचे म्हणजे घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. त्यामुळे यांनी (मनसे) उगाच श्रेय घेऊ नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जबरदस्त टोला लगावला.

यावेळी उदाहरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, ‘मध्यंतरी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या अग्रलेखात निश्चलनीकरणाबाबत लिहिले होते. निश्चलनीकरणाच्या निर्णयासाठी खोटय़ा नोटांचं कारण देण्यात आलं होत. संपूर्ण अर्थव्यवस्थेत किती टक्के खोट्या नोटा होत्या ? काही टक्क्यांत असतील. पण त्या काही टक्क्यांसाठी तुम्ही संपूर्ण चलनी नोटांचे कागदाचे तुकडे केलेत, तसे काही टक्के घुसखोरांसाठी संपूर्ण देशाला रांगेत उभं करताय. मला असं वाटतं, या सरकारचं एक विचित्र धोरण आहे…सतत तुम्हाला टेन्शनखाली ठेवायचं.”

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मुंबईतील वर्सोवा भागात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असे पोस्टर लावण्यात आले आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावे आहेत.