लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर मास्क ठेवायचा की काढायचा? AIIMS च्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. मात्र अशातच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनी मास्क परिधान नाही केला तरी चालेल, असे अमेरिकेने तिथल्या स्थानिक नागरिकाना म्हटले आहे. मेरिकेच्या या निर्णयानंतर भारतात देखील कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मास्क काढायचा का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसे नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील,तरी मास्क लावणे आवश्यक असल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही भारतात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचे नव रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यामुळे जस अमेरिकेत मास्क उतरवला आहे, तसे भारतात अजिबात करु नका, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. दरम्यान देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून 1.92 कोटी लसींचे डोस पुरवले जाणार आहे. यापूर्वी देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.