ST चा अजब कारभार, प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीसांची भीती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सुखकर प्रवास, सुरक्षीत प्रवास समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात मनमानी कारभार सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी याचा प्रत्यय स्वारगेट बस स्थानकावर आला. शिवशाही रद्द झाल्याने त्या गाडीचे प्रवासी बसवण्यासाठी अगोदर बसलेल्या प्रवाशांना पोलिसांची भीती घालून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाजी नगर बस स्थानकावरून निघालेली पुणे उस्मानाबाद (MH 20 blog 3889) ही बस स्वारगेट बस स्थानकावर आली. त्यावेळी दोन प्रवासी गाडीत आले . त्यांनी सीट बुक केल्याचे वाहकाला सांगितले. वाहकाने शिवशाहीचे बुकिंग असल्याचे प्रवाशांना सांगितले. यावरून वाहक आणि प्रवाशी यांच्यात बाचाबाची झाली.प्रवाशाने भुत्ता या अधिकाऱ्याला बोलवून आणले. या अधिकाऱ्याने अगोदरच बसलेल्या प्रवाशांना उठण्यास सांगितले. मात्र इतर प्रवाशांनी विरोध केला असता या अधिकाऱ्याने पोलीस चौकीत चला अशी दमदाटी केली. शिवशाही रद्द झाल्याने आपण प्रवाशांना इतर गाडीत बसवत असल्याचे भुत्ता यांनी सांगितले. परंतु बसलेल्या प्रवाशांना पोलिसांची भीती दाखवून उठवणे योग्य आहे का ? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

शिवशाहीला प्रवासी मिळावेत म्हणून लालपरीच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत . त्यातच शिवशाहीचे होणारे अपघात पाहून प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच अधिकारी गाडी रद्द झाली म्हणून इतर गाडीमधील प्रवाशी खाली उतरवून त्या ठिकाणी शिवशाहीचे प्रवासी बसवतात. मात्र, इतर गाडीतील प्रवाशांना शिवशाहित बसवलं जात नाही, असे का ? असा सवाल काल प्रवाशांनी पोलीसनामाच्या वार्ताहराकडे केला.

भुत्ता या अधिकाऱ्याने कोणत्या अधिकाराने प्रवाशांना उठण्यास सांगितले याचे उत्तर महामंडळाने द्यावे असेही प्रवाश्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच एसटी महामंडळाच्या गहाळ कारभारावर प्रवाशी नाखूष आहेत. याचा फायदा खासगी वाहतूक करणारे उठवत आहेत. खासगी वाहतूक करणाऱ्याचा फायदा व्हावा यासाठी तर हे अधिकारी असे वागत नाहीत ना ? किंवा त्यांना खासगी वाहतूक दाराकडून कमिशन तर मिळत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार ?असाही प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.