टायगरच्या ‘बागी ३’ मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री 

मुंबई : वृत्तसंस्था – टायगर श्रॉफच्या ‘बागी’ आणि ‘बागी २’  चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. या चित्रपटांच्या नंतर चर्चा होत होती ‘बागी ३’ चित्रपटाची हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टायगरनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बागी ३’ ची घोषणाही केली होती. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे टायगर या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. पण हा शोध आता थांबला आहे. २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी ‘बागी ३’ साठी श्रद्धा कपूरचे नाव फायनल केले आहे.

यापूर्वी सारा अली खान हिचं नाव ‘बागी ३’ साठी चर्चेत होतं. ‘केदारनाथ’, ‘सिम्बा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी सारा ‘बागी ३’ मध्ये दिसेल अशी चर्चा काही दिवसापूर्वी रंगली होती परंतु साराला या चित्रपटातील भूमिका आवडली नाही म्हणून तिने या चित्रपटाला नकार दिला अशीही चर्चा झाली होती.

‘बागी’ चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका होती. २०१८ मध्ये आलेल्या बागी २ मध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी मुख्य भूमिकेत दिसले होते. आता पुन्हा टायगर आणि श्रद्धाची जोडी बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवते हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असून अहमद खान ‘बागी 3’ चं दिग्दर्शन करणार आहे.
You might also like