अभिनेता श्रेयस तळपदेचा इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांवर गंभीर आरोप, म्हणाला – ‘पाठीत खंजीर खुपसला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या करियरची सुरुवात मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून केली. त्यानंतर श्रेयसने आपला मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला. इक्बाल, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल आणि हाऊसफुल यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून श्रेयस चाहत्यांच्या भेटीला आला आणि त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये त्याला हवं तसं करियर करता आलं नाही. कारण काय ? तर मित्रांनी केलेली दगाबाजी. श्रेयसने याबाबत आपले अनुभव एका मुलाखतीतून शेअर केले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने आपल्या खासगी आयुष्यासोबत बॉलिवूडमधील करिअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यातल्या काही खुलाशांनी त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

स्वत:च्या मार्केटिंगला कमी पडलो

श्रेयस तळपदे याने अनेक चित्रपटामध्ये काम केले. यातील काही चित्रपटांमध्ये त्याने लीड रोडल साकारला. मात्र इक्बाल वगळता त्याचे सोलो चित्रपट फार चालले नाहीत. श्रेयसने त्याच्या अपयशामागचं प्रमुख कारण मार्केटिंग असल्याचे सांगितले. तो म्हणाला एक सोलो चित्रपट यशस्वी ठरला नाही, याचा अर्थ तर चित्रपटही चालणार नाहीत असा नसतो. मी अनेक सोलो चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण मी स्वत:चं मार्केटिंग करण्यात अपयशी ठरलो. मला प्रसिद्धी न मिळण्याचं मोठं कारण मार्केटिंग आहे. माझ्या कामामुळे मला काम मिळेल, याच भावनेतून मी आत्तापर्यंत काम केले.

मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला…

श्रेयसने या मुलाखतीमध्ये एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याचा खुलासा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्रेयस म्हणाला, काही अभिनेत्यांना माझ्यासोबत काम करताना असुरक्षित वाटते, असं मला कळालयं. सहाजिकच मी सिनेमात नसावं, असं त्यांना वाटतं. अनेक मित्रांसाठी, त्यांच्या हितासाठी मी सिनेमे केले. पण पुढे याच मित्रांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. अनेक मित्र मला मागे सोडून पुढे निघून गेले. आज ते सिनेमे बनवत आहेत. मला विचाराल तर इंडस्ट्रीत 90 टक्के लोक फक्त तुमच्या ओळखीचे असतात. केवळ 10 टक्के लोक तुमच्या कामामुळे मनापासून खुश होतात. इंडस्ट्रीत इगो खूप नाजूक गोष्ट आहे. कुणाचा अहंकार कधी व कसा दुखावेल, हे सांगता येत नाही. अमिताभ सारख्या महानायकाला त्याच्या करिअरमध्ये वाईट दिवस पहावे लागले, तर मी कोण आहे ? प्रत्येक अभिनेता या टप्प्यातून जातो. पण अजूनही मी चांगल्या भुमिकांचा भूकेला आहे. अभिनय करतानाच मला मरण यावं, असे मला वाटतं, असेही श्रेयस म्हणाला.

‘इक्बाल’ साठी लग्न रद्द करण्याचा सल्ला

श्रेयसचा इक्बाल हा त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. मात्र, या सिनेमासाठी त्याला स्वत:चे लग्न लपवावे लागले होते. श्रेयसने सांगितले की, इक्बालच्या शुटींग आधी मी दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्याकडे एक दिवसांची सुट्टी मागितली होती. तारीख होती 31 डिसेंबर त्याच दिवशी नागेश पार्टी ठेवणार होते आणि त्याच दिवशी माझं लग्न होतं. मी त्यांना लग्नाचं सांगितल्यावर त्यांनी मला लग्न रद्द करण्याचा सल्ला दिला. मी त्यांना म्हणालो, मी एक मध्यवर्गीय माणूस आहे. ज्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्यात. अशात तुम्ही मला लग्न रद्द करायला सांगत आहात. मी त्यांना खूप समजावलं. अखेरीस मी त्यांना म्हटलं हे लग्न लपवून ठेवलं जाईल फक्त मला एक दिवसाची सुट्टी द्या. तेव्हा कुठे ते तयार झाले होते. सुभाष घई यांना देखील माझ्या लग्नाबद्दल माहित नव्हतं. मजेदार म्हणजे श्रेयसची पत्नी दिप्ती नागेश यांची बहीण म्हणून इक्बालच्या प्रीमिअरला सहभागी झाली होती.