पोलीस ठाण्यातच दोन गटात तुफान हाणामारी

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने मारहाण केली. पोलीस ठाण्यातच ठाणे अमंलदारांसमोर एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.४) चार वाजण्याच्या सुमारास घटली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक जोडपे नातेवाईकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी दुस-या गटाने पोलीस ठाण्यात येऊन या जोडप्याला जबर मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करणारे एकमेकांचे म्हेव्हणे आहेत. या जोडप्याने चोरून लग्न केल्याच्या कारणावरुन त्यांना मारहाण करण्यात आली. या मारामारीमुळे पोलिसांची धावपळ उडाली.

मारहाण करणा-यांमध्ये एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-याचा समावेश आहे. श्रीगोंदा पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले आहे.