श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात सोमवारी (दि.२४) सकाळी पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाने कालपासून शहरात सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. काल सकाळी दहाच्या सुमारास मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांनी विसर्जन सोहळ्याची सुरुवात झाली होती. यानंतर शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती मंडपातून बाहेर पडले होते. त्यामुळे पुण्यात काल दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेट गणपतीची विसर्जन मिरवणूक सहा तास चालली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीतील लक्ष वेधवून घेणारे लहान मुलांचे वारकरी पथक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शाही मिरवणूक रात्री अकराला निघाली. सजवलेल्या रथामध्ये विराजमान बाप्पांची छबी टिपण्यासाठी पुणेकरांसह राज्यातील इतर भागातून आलेल्या भाविकांची गर्दी झाली होती. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या ‘श्री विश्वविनायक’ रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजवण्यात आला होता. मोती रंगाच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा होता. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले ५ कळस बसविण्यात आले होते. तसेच, २२५ आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले होते.
[amazon_link asins=’B00T4DQS7S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57dbb62c-bf91-11e8-97a2-01b0e59707ef’]
लक्ष्मी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे आकर्षक देखावे असलेले चित्ररथ आणि ढोलपथकांच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणुका पाहायला मिळाल्या. संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर अन्य सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडले. तेव्हा रस्त्यांवर आकर्षक रोषणाई केलेले चित्ररथ पाहायला मिळाले. पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या लोकांनी हे गणपती पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे चौका-चौकात गर्दी केली होती. आज सकाळपर्यंत ही लगबग सुरु होती.

पुणे | गणपती विसर्जन मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रोशनाई रथ

काल दिवसभरातही ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत पुणेकरांनी गणपतींना निरोप दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार डिजेचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येत होता.