उदयनराजेंच्या विरोधात नेहमीच ‘मिशीवाले’ उमेदवार का ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची आणि डायलॉगबाजीची चर्चा कायमच होत असते. त्यांचा राज्यभरात तसा धाक देखील आहे. परंतू उदयनराजे एका गोष्टीला घाबरतात ती म्हणजे पिळदार मिशी. हे खुद्द राजेंनीच सांगितले आहे. लोकसभेला मिशीवाल्या नरेंद्र पाटलांनी आव्हान दिले होते. आता पोटनिवडणूकीत आव्हान असणार आहे ते पिळदार मिशा असणाऱ्या श्रीनिवास पाटलांचे. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी दंड थोपटले आहेत.

राजेंच्या विरोधात कायमच मिशीवाले उमेदवार कसे काय लढतात असा एक प्रश्न आहे. मिशी मुळातच मराठ्यांची आन-बान-शान म्हणून ओळखी जाते. मिशीला ताव देत तसे राजेंच्या विरोधात नरेंद्र पाटलांनी देखील दंड थोपटले होते. परंतू त्यांना लोकसभेच्या रिंगणात यश मिळाले नाही, त्यावेळी राजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा लढवत होते, परंतू आता हेच राजे राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपकडून पोट निवडणूक लढवतील.

तसे साताऱ्यात नगरपालिकेत उदयनराजे यांचे विरोधक कोण तर त्यांचेच भाऊ शिवेंद्रराजे भोसले. ते देखील पिळदार मिशा असलेले. हे दोघे भाऊ असले तरी साताऱ्यातील स्थानिक राजकारणात त्यांचे कधी पटले नाही. शिवेंद्र राजेंची ओळख म्हणजे त्यांची दाढी आणि तलवार कट असलेले मिशी. तर लोकसभेत उदयनराजेंच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या नरेंद्र पाटील यांची पांढरी टोपी आणि आकडी मिशी. खरतर पिळदार, तडफदार मिशी ही साताऱ्याची ओळखच म्हणता येईल. पिळदार मिशा असलेल्या नरेंद्र पाटलांच्या विरोधात उदयनराजेंनी कॉलर उडवली होती. आता देखील त्यांचा पोटनिवडणूकीत सामना होणार आहे तो अशीच पिळदार मिशी असलेल्या श्रीनिवास पाटलांशी.

पिळदार मिशी असलेले श्रीनिवास पाटील हे माजी सनदी अधिकारी, राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल राहिले आहेत. आता या हायप्रोफाइल लढतीत कोण बाजी मारणार यावरुन ठरेल की राजे कॉलर उडवणार की पाटील आपल्या मिशीवरुन हात फिरवणार.

Visit : policenama.com