श्रीपाद छिंदम 70 जणांना शिवजयंती दिवशी शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवारी होणाऱ्या शिवजयंती दिवशी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्यासह 70 जणांना. शहरबंदी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस कायदा कलम 107 अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अाक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अडचणीत आलेला श्रीपाद छिंदम हा नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. शिवजयंती दिवशी शहरात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली तोफखाना व कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम 107 अन्वये 70 जणांचे प्रस्ताव पाठवले होते त्याला मंजुरी देत उपविभागीय अधिकाऱ्यांनी श्रीपाद छिंदम याच्यासह एकूण 70 जणांना एका दिवसासाठी शहर बंदी लागू केली आहे. मंगळवारसाठी (दि. 19) ही शहरबंदी लागू असेल.

मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंतीच्या मिरवणुकीस सुरुवात होईल. तारखेप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेसह काही सामाजिक संघटना सहभागी होतात. या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्लीगेट, निलक्रांती चौकमार्गे चौथे शिवाजी महाराज पुतळा अशी ही मिरवणूक होते.