जिंकूनही श्रीपाद छिंदम पडला एकाकी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवारायांचा अवमान करणारा अहमदनगरमधील भाजपचा तत्कालीन माजी उपमहापौर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून पुन्हा निवडूण आला. त्याला निवडुण आणण्यासाठी पडद्यामागे अनेक हालचाली झाल्या. मात्र, छिंदम जिंकून आल्यानंतर संबंध राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर नगरच्या मतदारांवरही लोकांनी आपला राग व्यक्त केला होता. यामुळेच महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पाठींबा हवा असतानाही जनक्षोभाचा विचार करून कुठल्याही राजकीय पक्षाने छिंदमला अजूनपर्यंत जवळ केलेले नाही.

नगरमध्ये सध्या महापौरपद उमेदवाराच्या अंतिम शर्यतीत शिवसेनेचे योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे व अशोक बडे ही तीन नावे राहिली आहेत; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुकुंदनगरच्या अपक्ष नगरसेविका मीनाज खान यांना सोबत घेत आपल्या १९ सदस्यांची गटनोंदणी केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकीय वर्तुळाला महापौर-उपमहापौर निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या २८ रोजी या दोन्ही पदांची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्रिशंकू असलेल्या मनपाच्या राजकीय स्थितीत कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणाला साथ देतात, याची उत्सुकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा वादग्रस्त श्रीपाद छिंदम याला महापौर-उपमहापौर निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे, पण त्याचा पाठिंबा घेणे म्हणजे शिवप्रेमींचा रोष ओढवून घेण्यासारखे असल्याने बहुतांश पक्षांनी त्याच्याशी संपर्क टाळला आहे. एकीकडे दोन अपक्ष नगरसेवकांपैकी एका नगरसेविकेला राष्ट्रवादीने आपल्या गटात घेतले आहे, पण जनतेचा रोष ओढावून घेऊन छिंदमला कोणीही सोबत घेण्यास तयार नाही. त्यामुळे तो सध्या एकाकी पडला आहे. मात्र, बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्याच्याशी फोनवर संपर्क करून चर्चा केल्याचे छिंदमच्या समर्थकांकडून सांगितले जाते आहे. या पाश्र्वभूमीवर आता त्याचे महापौर-उपमहापौर निवडणुकीतील मतदान उत्सुकतेचे झाले आहे.

qछदमविरोधात अजूनही जनक्षोभ काय असल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावण्यासाठी त्याने पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. यासाठी तो पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना तो भेटणार आहे. सोशल मीडियाद्वारे, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपल्याला धमक्या येत असून, मतदानापासून रोखण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र, नगरसेवक या पदाच्या माध्यमातून महापौर-उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा कायदेशीर अधिकार आपल्याला असल्याने तो बजावण्यासाठी २८ डिसेंबरला मनपा सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.