छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदमला हायकोर्टाचा दणका

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्याविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, आता औरंगाबाद खंडपीठाने दणका देत त्याची याचिका फेटाळली आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये महापालिका आणि ठाकरे सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले होते. सरकारच्या या आदेशाविरुद्ध छिंदमने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर महापालिकेतर्फे ऍड. विनायक होन आणि सरकारतर्फे ऍड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडलेली. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे. यामुळे अशी याचिका थेट उच्च न्यायालयात दाखल करता येत नाही, असा युक्तिवाद करत ऍड. होन यांनी महापालिकेची बाजू मांडली. त्याची दखल घेत न्यायमूर्ती पाटील यांनी छिंदम याचा अर्ज फेटाळत दणका दिला आहे.

काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेत २०१८ मध्ये उपमहापौरपदी असताना फोनवरील संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपवरुन छिंदम यांच्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

याप्रकरणी भाजपवर राज्यभरातून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली. पुढे त्याला नगरसेवक पद गमवावे लागले. यानंतर छिंदम पुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये तो १ हजार ९७० मतांनी निवडून आला होता. २०१९ मध्ये त्याने विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. यात त्याचा पराभव झाला होता.