परशुराम वाघमारेंसाठी श्रीराम सेना मैदानात

बेंगळुरूः वृत्तसंस्था
कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार गाैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी परशुराम वाघमारेच्या बचावासाठी श्रीराम सेना मैदानात उतरली आहे. एेवढंच नाही तर श्रीराम सेनेनं फेसबुकवरून आर्थिक मदतीचं आवाहान देखील  केलं आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यासाठी थेट हिंदुत्ववादी संघटनाच पुढे सरसावल्यामुळे अनेक प्रकाराच्या चर्चांना उधान आलं आहे.
परशुराम वाघमारेच्या मदतीसाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन श्रीराम सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरुन केलं आहे. वाघमारे हा गरीब घरातील असून, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं श्रीराम सेनेनं म्हटलं आहे. तसेच श्रीराम सेनेच्या या फेसबुकवरील पोस्टवर वाघमारेचा फोटो छापण्यात आला आहे. धर्म रक्षणासाठी आर्थिक मदत करण्याकरता पुढे यावे, असं आवाहन या पोस्टरवरून केलं आहे. आर्थिक मदत जमा करण्यासाठी या पोस्टवर बॅंक अकाऊंट नंबरही देण्यात आला आहे. या खात्यावर पैसे जमा करण्याची विनंती सुद्ध करण्यात आली आहे.
गाैरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. सुरूवातीपासूनच त्यांच्या हत्येमागं हिदुत्ववादी संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. यानंतर वाघमारे याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. वाघमारे याच्या अटकेनंतर श्रीराम सेनेनं त्याला मदतीच आवाहन केल्याने अनेक प्रकारचे तर्क- वितर्क लढवले जात आहेत.