‘रेमडेसिवीर’चा साठा आणल्याप्रकरणी खा. विखे अडचणीत, DySp कडून प्रकरणाचा तपास सुरु

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना दिल्लीतून गुप्तपणे खासगी विमानाने रेमडेसिवीरचा साठा आणल्याने अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक मिटके शुक्रवारी (दि. 30) विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

खासदार डॉ.विखे यांनी दिल्लीवरून विमानाने रेमडेसिविर आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या इंजेक्शन खरेदीवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना शिर्डी विमानतळावर 10 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान खासदार विखे म्हणाले की, आपल्या मैत्रीचा वापर करत आपण दिल्लीहून थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांची मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर केल्याचे ते म्हणाले. विखेंनी शिर्डी विमानतळावर इंजेक्शनचा साठा उतरवला होता. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केले नाही.