पार्थ पवारांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पराभव ; मावळमधून श्रीरंग बारणे विजयी ; जाणून घ्या किती मतांनी विजयी झाले

मावळ (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात एकतर्फी लढत झाली. मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पराभव झाला असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे २,१३,७४४ मतांनी निवडून आले आहेत.

शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना ७,०२,२४३ मते पडली तर राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना ४,८८,४९९ मते पडली. मतमोजणीत बारणे यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतले होते. मावळ लोकसभा मतदार संघात एकूण मतदार २२ लाख ९७ हजार ४०७ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण १३ लाख ६५ हजार ८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ५९. ४५% मतदान झाले होते.

पराभवाविषयी शरद पवार यांची पतिक्रिया
पार्थ यांच्या पराभवाविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ” मावळातील जागा ही न येणारीच होती . मागील निवडणुकीत देखील मावळात आमचा उमेदवार आला नव्हता. न येणाऱ्या जागेवर प्रयत्न करावा म्हणून आम्ही मावळ मतदार संघातून पार्थ यांना उमेदवारी दिली. मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचा व्यास वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही पार्थला उभे करून प्रयत्न केला. मात्र मावळ मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली”.

नातवासाठी शरद पवारांची माघार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शारद पवार यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. यासाठी राष्ट्रवादीकडून हक्काच्या मावळ मतदार संघाची निवड करण्यात आली. राजकारणात नवख्या असलेल्या पार्थला यश मिळावं याकरिता संपूर्ण पवार परिवार मैदानात उतरले होते. तर अनुभवी असलेल्या श्रीरंग बारणे यांनी गावो-गावी आणि घरोघरी जाऊन प्रचार केला. बारणे यांना भाजपच्या आमदारांची आणि पदाधिकार्‍यांची तसेच कार्यकर्त्यांची चांगलीच मदत झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना शेकापची चांगलीच साथ मिळाली.

मावळ मतदारसंघाचा इतिहास –

२००८ च्या पुनर्रचनेनंतर मावळ या मतदारसंघाची निर्मिती झाली. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. मावळ मतदार संघामध्ये २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून आझम पानसरे यांना तर युतीकडून गजानन बाबर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे ८० हजार मतांनी पराभूत झाले होते. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून खासदार श्रीरंग बारणे यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्याविरोधात आमदार लक्ष्मण जगताप, मनसे आणि शेकाप यांचे उमेदवार होते. बारणे यांनी बाजी मारत तब्बल १ लाख ५९ हजार मतांनी विजय मिळवला होता.

मावळ मतदार संघ

एकूण मतदार – २२, ९७, ४०७

एकूण मतदान – ५९. ४५%

विजयी उमेदवार – श्रीरंग बारणे

मिळालेली मते – ७,०२,२४३