Latur News : सलग 24 तास लावणी नृत्याचा विक्रम, लातूरच्या सृष्टी जगतापची आशिया बुकमध्ये नोंद

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी जगतापने तब्बल 24 तास लावणी नृत्य सादर करुन आशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या निरीक्षकांनी ही घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनी (दि. 26) दुपारी दोन वाजेपासून थिरकणारे तिचे पाय बुधवारी (दि. 27) विक्रम नोंदवूनच थांबले.

लहानपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या व नृत्याच्या सर्व प्रकारात निपुण असलेल्या सृष्टीने यापूर्वी अनेकदा सलग 12 तासापेक्षा जास्त काळ नृत्य सादर केलेले आहे. या विक्रमासाठी तिने गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती.

लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सृष्टीने हा विक्रम नोंदवला आहे. सृष्टीने मंगळवारी दुपारी तिच्या लावणी नृत्याला सुरुवात केली. दर तासाला तीन मिनिटे तिला विश्रांतीची मुभा दिली होती. डॉक्टरांचा चमू दर दोन तासानंतर तिची तपासणी करीत होता. तिला प्रोत्साहन देण्यासाठी लातुरकरांनी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थिती लावली होती. आशिया बुक रेकॉर्डचे निरीक्षक उपस्थित होते. तिच्या नृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. तिचे वडील सुधीर जगताप आणि आई संजीवनी हे औसा तालुक्यातील कारला येथील जिल्हा परिषदेच्या येथील शाळेत शिक्षक आहेत. लेकीच्या या विक्रमाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू तरळले होते.