‘नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकाचं थोबाड फोडा’

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही सांगितले. या सभेला मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी व प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम उपस्थित होते.

नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द होऊनही सामानामध्ये रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी नाणार परिसरात शिवसेनेने सभा घेतली. नाणार रिफायनरी रद्द होऊन विधानसभा निवडणुका पार पडल्या तरी समानामध्ये रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात उघडपणे रिफायनरीचे समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेला सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली.

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा यापूर्वी केली आहे. गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत व ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपला आहे. नाणार प्रकल्प गाडलेला आहे, तो परत कुणी उकरून काढण्याचा प्रयत्न करु नये, असे राऊत यांनी सांगितले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल त्याचे मिळेल त्या चपलेने थोबाड फोडा असे राऊत यांनी या सभेत सांगितले.