संजय राऊत आता कॉमेडियन कुणाल कामराला उत्तर देणार

पोलिसनामा ऑनलाईन – खासदार संजय राऊत कंगना रणौतवर केलेल्या टीकेवरून देशभरात चर्चेत आले. त्यामुळे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीने करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास राउत यांनी होकार दिल्यामुळे लवकरच ही मुलाखत होणार आहे.

कुणाल कामराने खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यासंदर्भात ट्विट केले होते. राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसर्‍या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,’ असे म्हटले होते. त्याचे हे निमंत्रण राऊत यांनी स्वीकारले आहे. लवकरच ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या मुलाखतीचे चित्रीकरण खारमधील स्टुडिओत केले जाणार आहे. या मुलाखतीसंदर्भात स्वतः राऊत यांनीही रिट्विट केले आहे. कुणाल कामराच्या या शोमध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, सचिन पायलट यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झालेली होती.