धक्कादायक ! भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांना टिप्परने उडवले, एक जागीच ठार

सेनगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भावाला भोसकून ठार केले म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी एकाने दुचाकीवर टिप्परच घातला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या सुकळी पाटी येथे घडला. त्यानंतर टिप्पर चालविणाऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन समर्पण केले.

सुभाष अर्जून देवकर असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर या घटनेत येलप्पा अर्जून देवकर हा गंभीर जखमी आहे. शिवाजी किसन संत (३२) हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

भावाला भोसकून जखमी केल्याचा बदला

शिवाजी संत आणि येल्लापा देवकर हे सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील राहणारे आहेत. यांच्यात पुर्वीचाच वाद होता. एक वर्षभरापुर्वी येलापाने शिवाजीचा भाऊ सुरेश याला चाकूने भोसकले होते. त्यानंतर सुरेश एक वर्षभरानंतर मरण पावला. मात्र त्याचा राग शिवाजीच्या मनात होता.

पत्रिका वाटण्यासाठी जात होते दोघे

येलापाच्या बहिणीचे येत्या १९ मे रोजी लग्न आहे. येलापा आणि त्याचा भाऊ सुभाष हे दोघे लग्नपत्रिका वाटण्यासाठी घरातून बाहेर पडले. दुचाकीवरून शेजारच्या गावांमध्ये पत्रिका वाटण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता येलापा भावासोबत सेनगावकडे येत होता. त्याचा सुगावा शिवाजीला लागला.

तो टिप्पर घेऊन त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करू लागला. त्यानंतर सेनगावजवळील सुकळी पाटीजवळ आल्यावर त्याने भरधाव टिप्पर दुचाकीवर चढवले. त्यानंतर यात दुचाकी चालविणारा सुभाष जागीच ठार झाला. तर येलापा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर शिवाजी थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.