‘या’ माजी मुख्यमंत्र्याचा घणाघात, हिटलरसोबत तुलना करत म्हणाले – ‘मोदी सरकार फॅसिस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही. नरेंद्र मोदी केंद्रात ‘फॅसिस्ट’ सरकार चालवत आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारवर केली आहे. बेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

चिकमगळुरूतील कालसा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्याचवेळी पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठीच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सिद्धरामय्या म्हणाले की, ‘तीन महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर केवळ एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनतेने भरलेला कर दरमहा सरकारजमा करत आहे.

त्यामुळे तिजोरी रिकामी राहूच शकत नाही. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी फारच कमी ज्ञान आहे.राज्यात पूर आल्यानंतर अनेक महिन्यांनंतर सरकारला मदतकार्यासाठी केंद्राकडून निधी मिळू शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही. नरेंद्र मोदी केंद्रात ‘फॅसिस्ट’ सरकार चालवत आहेत.

सरकारे अस्थिर करणे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात –
सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप यापूर्वी सिद्धरामय्या यांनी केला होता.

Visit : Policenama.com