दुचाकींसाठी साईड मिरर खरंच गरजेचा पण…; कारवाई होतीये? तर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सध्या पुणे शहरात दुचाकीला दोन आरसे नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पण आता या कारवाईलाही नेहमीप्रमाणेच पुणेकरांकडून विरोध होतोय. कोणताही विरोध न करता निमुटपणे कायद्याचे पालन करणे हे जणू पुणेकरांना जमणार नसल्याचेच दिसते. यापूर्वीही पुणे शहरात दुचाकीस्वारांसाठी अनेक नियम लागू करण्यात आले होते. पण त्यालाही विरोध झाला.

हेल्मेटसक्ती हा त्यापैकी एक महत्वाचा विषय आहे. पुण्यात जवळपास 31 लाखांपेक्षा अधिक दुचाकी आहेत. तसेच या दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असताना दुचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांच्या दृष्टीने विविधे कायदे लागू करण्याचा विचार पोलिसांकडून सध्या सुरु आहे. त्यापैकी एक म्हणजे सध्या सुरु असलेली दोन आरसे नसलेल्या दुचाकींवरील कारवाई.

दुचाकीला दोन आरसे असणे ही बाब खरंच गरजेची आहे. त्यामुळे वाहनचालकाला मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येऊ शकतो आणि त्यानुसार वाहन चालवता येऊ शकते. पण अनेकजण ते न स्वीकारता त्यालाच मोठा विरोध करत आहेत. काही ‘सजग’ पुणेकरांकडून तर कारवाईचे निमित्त काढून पोलिसांकडून वसूली सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जर आपण दुचाकी असो किंवा चारचाकी, वाहन चालवताना त्यासंबंधी आवश्यक नियम, कागदपत्रांची पूर्तता केल्यास आपणाला कोणत्याही पोलिसाला दंड म्हणून पैसे द्यावे लागणार नाहीत.

आरसे चोरीच्या घटना

जेव्हा वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, तेव्हापासून अनेक ठिकाणी दुचाकी वाहनावरील आरसे चोरण्याचे प्रमाण वाढल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच शहराच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यस्त असलेले पोलिस आणि त्यात दुचाकीवरील आरसा चोरीला जाणे, या प्रकाराची नोंद घेतली जात नसल्यानेही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, पोलिस आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

चालकाच्या सुरक्षिततेसाठीच कारवाई

पोलिसांकडून जी काही कारवाई वाहनचालकांवर होत आहे ती त्यांच्या सुरक्षिततेसाठीच केली जात आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. मागील वर्षी झालेल्या रस्ते अपघातात शंभरपेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू झाला आणि यातील गंभीर बाब म्हणजे 40 पेक्षा जास्त दुचाकींना मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने धडक दिली आहे. या सर्व अपघातांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आता दोन आरसे बंधनकारक केले आहेत.

मास्कसाठीही दंड

कोरोना व्हायरससारख्या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. पण तरीही मास्क लावण्याला काही पुणेकरांनी प्राधान्य दिले नव्हते. मात्र, जेव्हा त्यासाठी दंड आकारला जात होता तेव्हापासून पुणेकर जागरुक झाले. अन् फक्त अन् फक्त दंडाच्या भीतीपोटी मास्क लावायला लागले.

पोलिस-वाहनचालकांमध्ये समन्वय महत्वाचा

जेव्हा कधी दुचाकी वाहनचालकांसंबंधी नवा कायदा किंवा त्याची अंमलबजावणी केली जाते तेव्हा पोलिसांनीही वाहनचालकांच्या भावना, त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनीही दंडाची रक्कम वसूल करण्यापूर्वी त्या नियमांप्रती वाहनचालकांमध्ये जारूकता निर्माण करायला हवी. जसे यापूर्वी हेल्मेट घालणे का गरजेचे आहे, याची माहिती देणारे फलक, पोस्टर यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. जेव्हा कधी अशाप्रकारे पूर्वकल्पना देऊन कारवाई केल्यास त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या नक्की कमी असल्याचे पाहिला मिळेल.