सिद्धू पुन्हा कपिलच्या कार्यक्रमात दिसणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसचे विद्यमान मंत्री नवज्योत सिद्धू यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. देशात सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र आता नवज्योत सिद्धू हे या शोमध्ये पुन्हा परतणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

एका अवॉर्ड शोमध्ये कपिल शर्माला सिद्धू कार्यक्रमात पुन्हा परतणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “सिद्धूबद्दल सध्या मी काही सांगू शकत नाही. कारण सिद्धू सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहेत”, असं वक्तव्य कपिलने केले. त्यामुळे सिद्धू निवडणुकीनंतर शोमध्ये पुनरागमन होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

द कपिल शर्मा शोमधून सिद्धूला कार्यक्रमातून काढल्याने सिद्धूंवरच नाही तर कार्यक्रमालाही फटका बसला आहे. सिद्धू यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचा टीआरपीही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे कार्यक्रामाचे निर्माते आणि चॅनलही चिंतेत आले आहे. तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेही यापुर्वी सिद्धूला शोमध्ये पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “काही लोकांमुळे संपूर्ण देशाला गुन्हेगार समजणे चुकीचे आहे. हा एक भ्याड हल्ला होता, मी याचा विरोध करतो. हिंसा ही निंदनीय आहे. ज्यांची चूक आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असं वक्तव्य करत सिद्धूंनी पाकिस्तानची बाजू घेतली होती. त्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होत होत्या. लोकांच्या मागणीमुळे, रोषामुळे सिद्धू यांना शोमधून हटवण्यात आलं आणि त्याऐवजी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांना शोमध्ये घेण्यात आले होते.