विधानसभेत सिध्दूची ‘त्या’ आमदारांसोबत बाचावाची

पंजाब : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट असताना माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिध्दू यांनी पाकिस्तान बरोबर चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो असे मत मांडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफर टीका सुरु असून त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या अकाली दलाच्या आमदारांनी त्यांना प्रखर विरोध केला.

त्यामुळे सिध्दू यांचा पारा चढला आणि अकाली दलाचे आमदार बिक्रम सिंग मजिठिया यांच्याबरोबर त्यांची शाब्दीक वादावादीही झाली. सिध्दू यांना मंत्रीपदावरुन हटवण्यात यावे अशी अकाली दलाच्या आमदारांची मागणी आहे. सिध्दू यांची कपिल शर्माच्या शो मधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मजिठिया यांच्या नेतृत्वाखाली अकाली नेत्यांनी सिध्दू यांच्या पाकिस्तान भेटीचे फोटो जाळले आहे.

पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळाभेट घेतानाचे हे फोटो होते. विधानसभेत मजिठिया आणि अन्य आमदारांनी सिद्धू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व फोटो झळकवून दाखवले. हातावर काळी फित बांधून आलेले हे आमदार सिध्दू बोलत असतानाही घोषणाबाजी करत होते. सिध्दू  आणि मजिठिया यांच्यात शाब्दीक वादही रंगला होता. मागच्या वर्षी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळयासाठी सिध्दू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले होते. या संपूर्ण वादावर आम्हाला काँग्रेस आणि पंजाब सरकारची काय स्पष्ट भूमिका आहे ते समजले पाहिजे. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध करणार का ? असा सवाल मजिठिया यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला. सभागृहात एकमताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.