Signal भारतात अ‍ॅप स्टोअरवर बनले Top Free App, WhatsApp ला टाकले मागे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – व्हॉट्सअ‍ॅपने (Whatsapp) आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवीन पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होईल. या नवीन पॉलिसीमुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या डेटावर आधीपेक्षा जास्त नजर ठेवू शकेल आणि हा डेटा फेसबुकवरही (Facebook) शेअर केला जाईल. वापरकर्त्यांनी हे नवीन धोरण स्वीकारणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना त्यांचे खाते डिलीट करावे लागेल. दरम्यान, सिग्नल (Signal )अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन धोरणामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे आणि आता लोक प्रायव्हसी फोकस अ‍ॅप सिग्नलकडे जाऊ लागले आहेत. आता हा अ‍ॅप अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये टॉप फ्री अ‍ॅप बनला आहे. सिग्नलने अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधील टॉप फ्री अ‍ॅप्सचा चार्ट ट्वीट केला. यात पाहिले जाऊ शकते की, अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारतात सिग्नलने व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंडमध्येही सिग्नलने व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकले आहे. या व्यतिरिक्त, सिग्नल हंगेरी आणि जर्मनीमधील गूगल प्ले स्टोअरमध्येही टॉप फ्री अ‍ॅप बनला आहे.

माहितीनुसार, सेन्सर टॉवरच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, गेल्या दोन दिवसांत 100,000 पेक्षा जास्त लोकांनी Android आणि iOS डिव्हाइसवर सिग्नल अ‍ॅप डाउनलोड केले आहेत. तसेच अहवालात असे म्हटले आहे की, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन इंस्टॉलेशन 11 टक्क्यांनी घसरले आहे. सिग्नलचे डाउनलोडिंग अचानक वाढले आहे. कारण लोक व्हॉट्सअ‍ॅपचे अल्टरनेटीव्ह शोधत आहेत. सिग्नलच्या अचानक लोकप्रियतेचे श्रेय एलन मस्कला दिले जाऊ शकते. कारण यापूर्वी त्यांनी ‘यूज सिग्नल’ लिहून ट्विट केले होते. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनीही हे ट्विट पुन्हा रिट्विट केले.